जळगाव – शहरातील आकाशवाणी चौकातील गणपती हॉस्पिटलचे संचालक डॉ. शीतल स्वरूपचंद ओसवाल यांना न्यायालयाने धनादेश अनादरप्रकरणी 50 लाखांचा दंड आणि एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या कारवाईने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
याचिकाकर्ते अनिल तोताराम शिरसाळे व त्यांची पत्नी 2002 पासून डॉ. शीतल ओसवाल यांच्या गणपती हॉस्पिटलमध्ये लॅब टेक्निशियन म्हणून कामाला होते. या दाम्पत्याला डॉ. ओसवाल यांनी 55 लाखांचे धनादेश सेवेच्या वेतनापोटी दिले. सोबतच धनादेश दिल्याचे पत्र दिले होते. डॉ. ओसवाल यांनी दिलेले दहा लाखांचे दोन व पाच लाखांचा एक धनादेश वटला नव्हता. यामुळे शिरसाळे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी धनादेश अनादर प्रकरणी तीन याचिका दाखल केल्या होत्या. प्रथम वर्ग न्यायमूर्ती जान्हवी केळकर यांच्यासमोर तिन्ही खटल्यांचे कामकाज सुरू होते. त्यात डॉ. ओसवाल दोषी ठरल्याने तिन्ही खटल्यांत त्यांना दंडासह तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. 12 सप्टेंबर 2019 रोजी दिलेल्या पाच लाख 73 हजार 548 रुपयांच्या धनादेश अनादर प्रकरणी दहा लाखांचा दंड, एक वर्षाची शिक्षा, 12 एप्रिल 2020 रोजी दिलेल्या दहा लाखांच्या धनादेश अनादर प्रकरणी वीस लाखांचा दंड आणि 10 जानेवारी 2021 रोजी दिलेल्या दहा लाखांच्या धानदेश अनादर प्रकरणी वीस लाखांचा दंड व तीन महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली. शिरसाळे यांच्या वतीने अॅड. आर. आर. गिरणारे व अॅड. हेमंत गिरणारे यांनी काम पाहिले.
हे देखील वाचा…
गोमांसाच्या संशयावरून जमावाने पेटविली मालमोटार.
पाचोऱ्यात मध्यरात्रीचा थरार, आरोपीचा पोलिसांवर हल्ला; पोलिस जखमी; आरोपी अटकेत
गो.से.हायस्कुल मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा