पाचोरा ता 18 – येथे “शिव जयंती” निमित्त आज भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहीती शिव जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संजय वाघ व संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शिव जयंतीनिमित्त शनिवारी मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर ढोलताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करून मशाल पुजनाचा कार्यक्रम झाला. आज सकाळी ७:३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिव जयंती समितीचे अध्यक्ष संजय वाघ, संजय पाटील, उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसिलदार कैलास चावडे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांचेसह विविध शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिवरायांच्या पुतळ्यास मानवंदना करुन ध्वजारोहण होईल. तद्नंतर शहरातील विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी विविध वेशभूषा परिधान करुन महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेस व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणुक काढण्यात येणार आहे. ही मिरवणूक महात्मा ज्योतिराव फुले स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, रेल्वे स्थानक रोड, देशमुखवाडी, हुसेनी चौक, आठवडे बाजार, बाहेरपुरा, गांधी चौक, जामनेर रोड मार्गे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात येणार आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक यांचा सन्मान करण्यात येणार आहे. सायंकाळी पाच वाजता कृष्णापुरी येथुन डोळ्यांचे पारणे फिटले असा छत्रपती शिवाजी महाराज यांची १२ टायर ट्राॅला वरुन अष्ट प्रधान मंडळाचा जिवंत देखाव्याचे मिरवणुकीद्वारे बघता येणार आहे. अशी माहिती शिव जयंती समितीचे अध्यक्ष संजय वाघ व संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सार्वजनिक उत्सव समिती, पाचोरा व जय हिंद लेझीम मंडळ, कृष्णापुरी यातील पदाधिकारी व सदस्य गेल्या १५ दिवसांपासून अथक परिश्रम घेत आहेत. या कार्यक्रमांना परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन उत्सव समितीचे अध्यक्ष संजय वाघ व संजय पाटील यांनी केले आहे.
एकनाथ शिंदेंना शिवसेना आणि धनुष्यबाण मिळालं, निवडणूक आयोगाचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का