जळगाव : येथील आंतरराष्ट्रीय आगामी सॉफ्टबॉलपटू सई अनिल जोशी हिची आशियाडसाठी भारताच्या १६ सदस्यीय महिला सॉफ्टबॉल संघात निवड झाली आहे. तिच्यासोबत महाराष्ट्राच्या पाच महिला खेळाडूंनी भारतीय संघात स्थान मिळवले आहे. भारतीय सॉफ्टबॉल संघटनेतर्फे या संघाची सोमवारी घोषणा करण्यात आली. आशियाड सामने चीनमधील हांगझू शहरात यंदा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणार आहेत. त्यात सॉफ्टबॉलचा प्रथमच समावेश करण्यात आला आहे. त्यासाठी निवड होऊन सई ही आशियाडसारख्या अव्वल स्पर्धात खेळणारी खान्देशातील पहिलीच खेळाडू ठरणार आहे. तिने याच्याआधी बऱ्याच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळल्या असून यंदाच्या फेडरेशन कप विजेत्या संघातही ती होती. ती विधी महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून जैन इरिगेशनचे मीडिया व्हाईस प्रेसिडेंट अनिल जोशी यांची कन्या आहे. आशियाडसाठी भारतीय संघाचे प्रशिक्षण शिविर ५ ते २५ ऑगस्टदरम्यान चंडीगड येथे होणार आहे.
डोळे येणाची साथ- लक्षणे, निदान , समज व गैरसमज