सोयगाव : सोयगाव तालुक्याच्या नायगाव येथे सालगडी म्हणून काम करणाऱ्या परप्रांतीय मजुराच्या घरावर मध्यरात्री दोनच्या सुमारास धाडसी दरोडा पडला आहे. या मजुराने बँकेत खाते नसल्याने घरात खड्डा करून त्यात चार किलो चांदी आणि चार लाख पन्नास हजार रुपयांची रोकड ठेवली होती. त्यावरच दरोडेखोरांनी डल्ला मारला, हे विशेष. कालू महारिया सेनानी असे चोरी झालेल्या सालगड्याचे नाव आहे.
जिल्हा परिषद अंतर्गत गट क संवर्गासह राज्यशासनातील ८० टक्के रिक्त जागा भरणार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातून आलेला कालू हा सुभाष पाटील यांच्या शेतात सालगडी म्हणून काम करतो. त्याच शेतात बांधलेल्या छोट्या घरात तो कुटुंबासह राहतो. रविवारी रात्री दोन खोल्यांत कालू यांची दोन मुले व दोन मुली झोपले होते. तर पत्ती, पत्नी दोघे बाहेर बाजेवर झोपले होते. मध्यरात्री रात्री दोन वाजेच्या सुमारास चार ते पाच दरोडेखोरांनी आधी घराचा वीजपुरवठा खंडित केला. अंधाराचा फायदा घेत कालूचा मुलगा वेरसिंग याला नावाने आवाज देऊन उठविले. त्याने घराचा दरवाजा उघडताच दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला.त्यानंतर वेरसिंगला चाकू दाखवून सामानाची उचकापाचक कैली. कालूच्या कुटुंबाने घरात खड्डा खोदून एका डब्यात चार किलो चांदी व साडेचार लाख रुपयांची रोकड ठेवली होती. दरोडेखोरांनी धमकावून हा डबा बाहेर काढायला लावला. त्यानंतर दागिने व पैसे घेऊन दरोडेखोर फरार झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्यासोबत आलेल्या श्वानाने काही अंतरापर्यंत माग काढला. मात्र, पुढे दरोडेखोर वाहनामधून पसार झाल्याची शक्यता पोलिसंनी व्यक्त केली. दरम्यान, कालूसह त्यांच्या मुलांनी रात्रंदिवस काम करून मिळालेल्या पैशातून काही रक्कम साठवतानाच उरलेल्या रकमेतून चांदी खरेदी केली होती. कुणाचेही बँकेत खाते नसल्याने हा ऐवज घरातच खड्डा खोदून त्यात ठेवला होता. कुणाला संशय येवू नये म्हणून त्या जागेवर संसारोपयोगी सामान ठेवलेले होते. मात्र, चोरट्यांनी तीच जागा शोधून काढल्याने ओळखीच्या व्यक्तीचा या दरोड्यात सहभाग असण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
धुळ्यात पोलीस निरीक्षकाच्या आत्महत्या..