जळगाव शहरात दिवाळीच्या दिवशी झालेल्या वादातुन तांबापुरा भागातील एका तरुणाचा खून होऊन दोन गटात दगडफेक झाली त्यात चार जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
दिवाळीच्या दिवशी फटाके फोडण्याच्या कारणामुळे झालेल्या वादातून मंगळवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास तरुणाचा चॉपर भोसकून खून झाल्याची घटना शहरातील तांबापुरा परिसरात घडली. संजय सिंग प्रदीप सिंग टाक (वय-१९ रा.शिकलकर वाडा) असे मयत तरुणाचे नाव असून यात चार जण गंभीर जखमी आहे.
प्राप्त माहितीनुसार, शहरातील तांबापुरा परिसरातील सिकलकर वाडा भागात राहणाऱ्या संजयसिंग प्रदीपसिंग टाक या तरुणाचा सोमवारी रात्री फटाके फोडण्यावरून त्यांच्या घराशेजारील मोनूसिंग, सोनूसिंग आणि मोहनसिंग यांच्यासोबत वाद झाला होता.
यावेळी दोघ गटात बाचाबाची होऊन वाद मिटला होता. मंगळवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास संजयसिंग हा घराबाहेर गल्लीतील मित्रांसोबत क्रिकेटच्या गप्पा करीत असताना मोनूसिंग बावरी, सोनू सिंग बावरी, मोनसिंग बावरी यांनी त्याच्यावर चॉपरने हल्ला केला. संजयसिंग याला वाचविण्यासाठी त्याचे वडील प्रदीपसिंग टाक, भाऊ करणसिंग टाक, काका बलवंतसिंग टाक, गल्लीतील व्यक्ती बग्गासिंग टाक यांनी वाचविण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर देखील हल्ला करण्यात आला.
चौघे देखील जखमी
तरुणावर वार झाल्यानंतर घटनास्थळी दोन्ही गटाकडून जोरदार दगडफेक करण्यात आली. मयत आणि जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले त्यावेळी मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, परिसरातून दोघांना ताब्यात घेण्यात आले असून इतर संशयीत फरार झाल्याची माहिती आहे.