तालुक्याच्या क्रीडाक्षेत्रासाठी प्रथमच भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार मंगेश चव्हाण यांनी मानले क्रीडामंत्री गिरिष महाजन यांचे आभार…
चाळीसगाव – तालुक्यातील क्रीडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी… पाटखडकी सबस्टेशन जवळ असणाऱ्या चाळीसगाव तालुका क्रीडा संकुलाच्या कामासाठी राज्य शासनाने ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याबाबत नुकताच शासन निर्णय प्रकाशित झाला असून तात्काळ ५० लक्ष रूपये वितरित देखील करण्यात आले आहेत.
आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नाने चाळीसगाव तालुक्यातील क्रीडाक्षेत्राला प्रथमच इतका भरघोस निधी उपलब्ध झाला आहे. राज्याचे क्रीडामंत्री गिरिष महाजन हे स्वतः क्रीडापटू आहेत, आमदार चव्हाण यांच्या मागणीची दखल घेऊन तात्काळ निधी मंजूर केल्याबद्दल त्यानी महाजन यांचे व राज्य शासनाचे आभार मानले आहेत.
*क्रीडापटूंसाठी राज्यस्तरीय दर्जाच्या सोयी-सुविधा उपलब्ध होणार…*
सदर निधीचा सुयोग्य विनियोग करून तालुक्यातील क्रीडापटूना राज्यस्तरीय दर्जाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याची प्रतिक्रिया आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली आहे.
याबाबत तालुका क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी यांना माहिती विचारली असता त्यांनी सांगितले की, सध्या अस्तित्वात असलेला जॉगिंग ट्रॅकचे पूर्ण नूतनीकरण व मजबुतीकरण करण्यात येऊन त्याला सर्व प्रकारचे मैदानी खेळ (एथिलेटिक्स) गोळाफेक, फुटबॉल योग्य बनविले जाईल तसेच मैदानावर पाणी साचू नये यासाठी अत्याधुनिक पर्पोरेट पाईप प्रणाली अवलंबली जाणार आहे.
सध्या अस्तित्वात असलेल्या हॉलचे देखील नूतनीकरण व विद्युतीकरण केले जाणार असून बॅडमिंटन सारख्या खेळांचा सराव प्रभावी पध्दतीने होण्यासाठी हॉलच्या फ्लोअर वर टेराफ्लेक्स च्या फ्लोअर मॅट्स वापरल्या जाणार आहेत.
हॉलच्या बाजूला बास्केटबॉल कोर्ट व त्यालगतच स्केटिंग रिंग देखील उभारली जाईल जेणेकरून जास्तीत जास्त खेळाडूंना विविध प्रकारच्या खेळांचा सराव करता येईल.
तसेच जागा उपलब्ध झाल्यास अत्याधुनिक सोयी सुविधा असणारा मल्टिपर्पज हॉल देखील उभारला जाईल. सदर तालुका क्रीडा संकुलाच्या विकासासाठी सदर निधीच्या माध्यमातून अजून काय सोयी सुविधा उभारता येतील याबाबत आमदार मंगेश चव्हाण व क्रीडाक्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन घेतले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
अभिनव विद्यालयातील आकाश व पवन याची नाशिक विभाग शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी निवड