जळगाव – जिल्ह्यात महामार्गावरील अपघातांचे सत्र थांबता थांबेना. एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा गावानजीक राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी सकाळी साडेनऊ-दहाच्या सुमारास दुभाजकाला धडक दिल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने खासगी बस नाल्यात कोसळून दोन ठार, तर बारा प्रवासी जखमी झाले. यात मृतांत चालकासह सहचालकाचा समावेश आहे. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा गावानजीक असलेल्या नाल्यात शनिवारी (16 सप्टेंबर) सकाळी साडेनऊ-दहाच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर श्री चौधरी यात्रा कंपनीची निमकथाना (राजस्थान) या जिल्ह्यातून येणारी आणि औरंगाबादकडे जाणारी शयनयान खासगी बस (एआर 01, वाय 0009) कोसळली. त्यात चालकासह सहचालकाचा मृत्यू, तर बारा प्रवासी जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी मदतकार्य सुरू केले. एरंडोल येथील पोलीस ठाण्याच्या कर्मचार्यांनी घटनास्थळी येत मृतांसह जखमींना एरंडोल ग्रामीण रुग्णालयासह जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यास मदत केली. बस दुभाजकाला धडक दिल्यानंतर चालकाचा नियंत्रण सुटल्याने नाल्याच्या खाली उलटल्याची माहिती मिळाली. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी ती तातडीने सुरळीत केली. जखमी प्रवाशांच्या नातेवाइकांना माहिती देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
मृतात मुकेशकुमार शंकरलाल गुर्जर (40, राजस्थान) असे असल्याचे समजते. दुसर्या व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. जखमी प्रवासी मुकेश छोटेलाल गुजर (35), बलराम किशोरराम गुजर (40), दीपेंद्रकुमार सिंग (40), अशोक यादव (35) यांच्यावर जळगावच्या जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात, तर अन्य दिनेश कुमार, रतनलाल कुमावत, जयराम कुंभार, महादेव कुंभार, राजेंद्र प्रजापती, सीताराम कुमार, लक्ष्मी जांगेड अशा सात जखमींवर एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मेहरूण येथील ३६ एकर जागेत साकारणार विभागीय क्रीडा संकुल