जळगाव – गोमांसाचा संशय असलेली मालमोटार पोलिसांनी सोडल्याच्या गैरसमजातून धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे दगडफेक केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्रीनंतर साडेबाराच्या सुमारास घडली. संतप्त जमावाने मालमोटारीलाही पेटवून दिले. दगडफेकीत पोलीस कर्मचारी जखमी झाला. या प्रकरणातील तेरा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, शुक्रवारी धरणगाव येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मालमोटारीत जनावरांचे चामडे मिळून आले आहे.
छत्रपती संभाजीनगरकडून धुळ्याकडे जात असलेली मालमोटार (यूपी 93, एटी 8135) बांभोरी (ता. धरणगाव) गावानजीकच्या एसएसबीटी महाविद्यालयाजवळील पेट्रोलपंपावर थांबली. मालमोटारीतून दुर्गंधी येत असल्याने काही तरुणांनी मालमोटार थांबवून ठेवली. तरुणांनी चालकाची विचारपूस केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यादरम्यान काहींनी पाळधी पोलीस दूरक्षेत्रात भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत माहिती दिली. तेथे पोलीस कर्मचार्याने धाव घेतली. पोलिसांनी मालमोटारीला पाळधी बायपासवरील गोदामाकडे पाठविले. चालक सल्लूखान बाबूखान व सहचालक मानसिंग श्रीराम कुशवाह (दोन्ही रा. उत्तर प्रदेश) यांच्याकडून पोलीस अधिकारी माहिती घेत होते. घटनास्थळी परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासाहेब पवार, तसेच धरणगाव येथील पोलीस ठाण्याचे निरीक्षकांसह पथक आले. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्यांनी मालमोटारीची तपासणी केली. त्यात जनावरांचे कातडे मिळून आले. त्यांनी नमुने घेत मालमोटार गोदामामध्ये लावण्याचे सांगितले. दुर्गंधी येत असल्याने मालमोटार गावाबाहेरील गोदामात लावण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. कार्यवाही सुरळीत व शांततेत सुरू असताना मालमोटार पाळधी दूरक्षेत्रात जमा न करता बायपासच्या दिशेने पुढे जात असल्याने पोलिसांनी मालमोटार सोडून देत असल्याचा गैरसमज तरुणांमध्ये झाला. यामुळे घटनास्थळी जमाव वाढत जाऊन तरुणांनी हस्तक्षेप केला. त्यामुळे गावासह परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. काही तरुण आक्रमक झाल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. जमाव महामार्गाच्या दिशेने आणि पाळधी गावाच्या दिशेने पळाला. मात्र, काही अंतरावरून तरुणांनी पोलिसांवर दगडफेक सुरू केली. त्यात एक कर्मचारी जखमी झाला. पोलीस वाहनांच्या काचाही फुटल्या. जमावाला नियंत्रित करीत असताना काही तरुणांनी घोषणाबाजी करीत मालमोटारीची तोडफोड करीत ती पेटवून दिली. मालमोटारीतील लहान सिलिंडर वेळीच बाहेर काढत डिझेल टँकजवळील आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला. जैन इरिगेशनच्या अग्निशमन विभागाच्या बंबाने आग आटोक्यात आणली.
दरम्यान, जमाव अधिक आक्रमक झाल्यामुळे पोलिसांची अतिरिक्त कुमक मागविण्यात आली. जखमी पोलिसाला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, चाळीसगावचे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश रावले. जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन-पाटील, जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक विशाल जैस्वाल यांच्यासह एरंडोल व पारोळा येथील पोलीस निरीक्षकांसह दंगानियंत्रण पथक दाखल झाले. पोलीस पथकांकडून संशयितांची रात्रीपासूनच धरपकड सुरू करण्यात आली होती. आतापर्यंत तेरा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी धरणगाव येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे देखील वाचा…
पाचोऱ्यात मध्यरात्रीचा थरार, आरोपीचा पोलिसांवर हल्ला; पोलिस जखमी; आरोपी अटकेत
अत्याचारातून पाचोऱ्यात अल्पवयीन मुलगी ५ महिन्यांची गर्भवती; संशयित तरुण अटकेत
स्वातंत्र्याच्या अमृत वर्षानिमीत्त “मेरी माटी, मेरा देश” हा उपक्रमाच्या पार्श्वभुमीवर विविध कार्यक्रमांचे नगरपरिषदेतर्फे आयोजन