पाचोरा (वार्ताहर) दि,१० पाचोरा शहरातील एम. एम. महाविद्यालय परिसरातून एका अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने ‘तुझे काका वारले तु माझ्या सोबत चल’ असे सांगून पळवून नेल्याची घटना बुधवारी दि.८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता घडली आहे. याबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात दुपारी ४ वाजता अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही शिक्षणासाठी पाचोरा शहरातील एम. एम. कॉलेज येथे बुधवार दि. ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता आली होती. दरम्यान, एक अज्ञात व्यक्ती त्यांच्या वर्गांत आला व त्याने तिच्या वर्ग शिक्षकास सांगून मुलीला बाहेर बोलावले. तसेच त्या अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलीला ‘तुझे काका वारले आहे, तू माझ्यासोबत चल’ असे सांगून सोबत घेवून त्यानंतर उशिरापर्यंत मुलगी घरी न आल्याने तिच्या नातेवाईकांनी तिच्या मैत्रिणी व इतर ठिकाणी शोध घेतला. परंतु तिची कुठलीही माहिती मिळत नसल्यामुळे शाळेत तपास केला असता ‘कोणीतरी अज्ञात व्यक्ती शाळेत आला होता व त्याने मुलीचे काका वारले असे सांगून मुलीला सोबत नेले, असे शिक्षकाने सांगितले. त्यामुळे पालकांनी पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे करीत आहे.
रेल्वेत नोकरीच्या बहाण्याने तरुणाला १७ लाखांचा गंडा