जळगाव जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासनस्तरावर असलेली कामे, त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने, संदर्भ यामध्ये अधिक लोकाभिमुखता, पारदर्शकता व गतिमानता येण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आता नागरिकांना आपली निवेदने व अर्ज थेट या कक्षात देता येणार असल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
याप्रसंगी मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी (महसुल) शुभांगी भारदे यांच्यासह माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
श्री. महाजन पुढे म्हणाले, जिल्हाधिकारी कार्यालयात वरच्या मजल्यावर मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सुरू झाला आहे. हा कक्ष कार्यालयीन कामाकाजाच्या वेळेत सुरू राहणार आहे. २० डिसेंबरपासूनच कक्षाचे कामकाज सुरू असून, आतापर्यंत १८ अर्ज कक्षात आले होते. त्यातील ५ अर्जांवर कार्यवाही करण्यात आली असून प्रलंबित अर्जांवर कार्यवाही सुरु आहे.
ज्या अर्जावर शासनस्तरावर कार्यवाही होणे अपेक्षीत आहे. तसेच काही अर्ज, निवेदन शासनाच्या धोरणात्मक बाबींशी निगडीत असतात अशी निवेदन त्या स्तरावरून मुख्यमंत्री सचिवालय कक्ष (मुंबई), यांच्याकडे पाठविण्यात येतात. मात्र जे जिल्हास्तरावरील किंवा उपविभाग, तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांशी संबंधित अर्ज आहेत ते संबंधित विभागाच्या जिल्ह्याच्या कार्यालय प्रमुखांकडे उचित कार्यवाहीसाठी पाठविण्यात येणार आहे. कार्यवाही नंतर संबंधित विभाग अर्जदारास केलेल्या कार्यवाहीबाबत अवगत करणार आहे. त्याची प्रत कक्षास पाठविणार आहे. या कक्षात आलेल्या अर्जांवर तीस दिवसात कार्यवाही होणे अपेक्षीत आहे. त्याबाबत जिल्हाधिकारी दर महिन्याला आढावा घेणार आहे.
जिल्ह्यातील नागरिकांनी मुख्यमंत्री सचिवालय व शासनस्तरावर असलेली कामे व त्यासंदर्भातील अर्ज, निवेदन जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सचिवालय कक्षाकडे लेखी स्वरुपात द्यावेत, असे आवाहनही श्री. महाजन यांनी यावेळी केले.
जमीनविषयक वाद कायमचे सोडवण्याची संधी