पाचोरा (वार्ताहर) दि,१०
रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या आमिष दाखवत भडगाव शहरातील बाळद रोड भागातील एका तरुणाची १७ लाखात फसवणूक करण्यात आली. संशयीतांनी बनावट नियुक्तीपत्र दिल्याचा प्रकार समोर आला असून या प्रकरणी भडगाव पोलिसात पाच संशयीतां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरातील रहिवाशी रंगनाथ साहेबराव पाटील (बाळद रोड) यांच्या फिर्यादीनुसार मुलगा अक्षय पाटील यास रेल्वेत नोकरी लावून देतो, असे सांगून संशयीत आरोपींनी विश्वास संपादन करत फिर्यादी कडुन तालुक्यातील वडजी व नाशिक येथे १५ लाखांची रोकड दि. ९ मे २०२२ पूर्वी स्वीकारली होती. तसेच नोकरी साठी नोटरी देखील करून दिली आहे. मात्र तक्रारदारास बनावट नियुक्तीपत्र देण्यात आले व त्यावर अधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संशयितांकडे रक्कमेची मागणी केली असता, घेतलेली रक्कम परत न केल्याने भडगाव पोलिसात तक्रार नोंदवली. नोकरीसाठी दिलेले १५ लाख व झालेला अन्य दोन लाखांचा खर्च असे एकूण १७ लाखांची फसवणूक करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
याबाबत रंगनाथ साहेबराव पाटील यांनी भडगाव पोलिसात दिलेल्या फिर्यादी वरून संशयित आरोपी धनराज किसनराव हाके रा. कमाल वाडी ता. जि. लातुर, मुन्ना सोनिया कुवर रा. वारस ता. साक्री जि. धुळे, सुनिल बंडु मानकर, प्रतिभा बंडु मानकर रा. नाशिक, कदम (पुर्ण नाव माहित नाही) रा. मुंबई यांच्या विरोधात पोलिसात गुरन ३४ २०२३ भादवी कलम ४२०, ४०६,४६४, ४६५, ४०९, व १२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर हे करीत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना; नागरिकांना अर्ज व निवेदने स्थानिक स्तरावर देता येणार