माजी मंत्री एकनाथराव खडसेंच्या स्वगृही भाजपात जाणार ? युवक संमेलनानिमित्त अमित शहांचा गुरुवारी दौरा ; मंत्री ना.गिरीश महाजन म्हणाले.
विशेष प्रतिनिधी (जळगाव)
जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे हे स्वगृही अर्थात भाजपप्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर भाजपचे नेते ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी, खडसे यांनी भाजपप्रवेशासाठी वरिष्ठ स्तरावर जोर लावले असले, तरी याबाबत मला काहीएक माहिती नाही. मात्र, दिल्ली व राज्यातूनही मला याबाबत कळले असल्याचे सांगत भाजपचे राष्ट्रीय नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे गुरुवारी (15 फेब्रुवारी) जिल्ह्यात येत असल्याची माहिती दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात भाजपचे नेते मंत्री महाजन हे सोमवारी (12 फेब्रुवारी) दुपारी आले होते. त्यांच्यासमवेत आमदार सुरेश भोळे व आमदार मंगेश चव्हाण हेही उपस्थित होते. यावेळी मंत्री महाजन यांनी केंद्रीय मंत्री शहा यांच्या दौर्याच्या नियोजनासह पक्षप्रवेश, विविध समाजांचे आरक्षण आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दाढीवरून उद्धव ठाकरे व संजय राऊत यांच्या वक्तव्यावर टीकास्त्र सोडले. मंत्री महाजन म्हणाले की, केंद्रीय मंत्री अमित शहा हे गुरुवारी (15 फेब्रुवारी) दुपारी युवा संमेलनानिमित्त जिल्ह्यात येत आहेत. त्यांच्यासमवेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही असतील. खान्देशातील चारही लोकसभा मतदारसंघांतील युवक-युवतींचा संमेलनात लक्षणीय सहभाग राहणार आहे. त्यांच्याशी शहा हे संवाद साधणार असून, सुमारे एक-दीड तास ते जिल्ह्यात राहणार आहेत. त्यानंतर ते छत्रपती संभाजीनगर येथे रवाना होतील, असे नमूद केले.
शहा यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याच्या मुद्यावर मंत्री महाजन यांनी, कोणताही पक्षप्रवेश होणार नाही. मात्र, रावेर येथील उद्योजक श्रीराम पाटील हे येत्या दोन-तीन दिवसांत पक्षप्रवेश करणार आहेत. त्यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी किंवा मुंबईत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. उद्योजक पाटील यांच्या प्रवेशामुळे पक्षाला मोठे बळ मिळणार असल्याचे सांगितले. खडसे यांच्या भाजपप्रवेशाच्या मुद्यावर मंत्री महाजन यांनी भाष्य केले. खडसे यांचे भाजपप्रवेशासाठी जोर लावून प्रयत्न चाललेले आहेत, असे मला राज्यातून आणि दिल्लीतूनही कळले; पण आपल्याला याबाबत म्हणजे खडसेंना घ्यायचं की घ्यायचं नाही, अशी काहीही विचारणा झालेली नाही. कदाचित मी छोटा कार्यकर्ता असेल. त्यामुळे असे असू शकेल. खडसेंनी वरिष्ठ स्तरावर ताकद लावावी. खडसेंची कदाचित वरून हॉट लाइन असल्यास त्यांनी निश्चित प्रयत्न करावेत, अशी खोचक टीकाही महाजन यांनी केली.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या दाढीविषयीच्या शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावर मंत्री महाजन यांनी टीकास्त्र सोडले. राऊत हे कोणाला काहीही बोलू शकतात. मंत्र्यांसह निवडणूक आयोग असेल, सर्वोच्च न्यायालय असेल, त्यांच्याविषयी टीकाटिपणी करीत असतात. त्यांच्या जिभेला हाडच नसल्यामुळे ते काहीही बरळतात. दाढीवाला रावण असे वक्तव्य करताना त्यांनी विचार करायला हवा होता. राऊत यांनी बोलताना विचार करावा, असा सल्ला मंत्री महाजन यांनी राऊत यांना दिला. राऊत यांच्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होणार नसल्याच्या मुद्यावर मंत्री महाजन यांनी प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरे होणार आहेत का? राऊतांच्या म्हणण्याप्रमाणे उद्धव ठाकरेंना प्रमोट करीत असतील, तर होतील उद्धव ठाकरे पंतप्रधान. राऊतांनी पक्षाचा एखादातरी खासदार निवडून आणून दाखवावा, असे आव्हान देत विनाखासदार असलेला व्यक्ती संसदेत येत असेल तर आनंदच आहे, अशी खोचक टीकाही मंत्री महाजन यांनी केली.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकरांनी मंत्री छगन भुजबळ यांना ओबीसी संघटनेचे नेतृत्व करावे. पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी आम्ही सामाजिक, राजकीय त्यांना पूर्ण मदत करायला तयार आहोत या वक्तव्यावर मंत्री महाजन यांनी भाष्य केले. भुजबळ हे सुरुवातीपासून ओबीसींचे पुरस्कर्ते र्आहेत. ओबीसींच्या पाठीशी भुजबळ हे खंबीरपणे उभे आहेत. प्रकाश आंबेडकर हे भुजबळ यांना सहाय्य करीत असतील तर त्यात काय वाईट आहे? असे महाजन यांनी म्हटले.
धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावर मंत्री महाजन यांनी सांगितले की, धनगर समाज आरक्षणासंदर्भात राज्य शासनाने आयोग नेमला आहे. आयोगामार्फत कार्यवाही सुरू झाली आहे. त्यासंदर्भात समाजाचे पदाधिकार्यांसोबत बैठकही घेण्यात आली आहे. धनगर समाजाच्या मागे सरकार खंबीरपणे उभे आहे. कोळी समाजाचासह गोवारी समाजाचाही तसाच प्रश्न आहे. घटनेने ज्यांचा जो हक्क अधिकार आहे, तो सरकार देण्याचा प्रयत्न करीत आहे, असेही त्यांनी सांगितले.
सकाळी फिरायला गेलेल्या पत्रकाराचा सर्पदंशाने दुर्दवी मृत्यू